Ad will apear here
Next
बालकवी... प्रिय सखा फुलांचा... ओढ्यांचा सांगाती!



बालकवी
अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे! बालसुलभ कुतुहलानं निसर्गघटितांकडे पाहणारा आणि निसर्गातल्या लोभस सौंदर्यानं बेभान होणारा शब्दसूरलहरींचा प्रवासी!  त्यांच्या काव्यप्रवासाचा रसास्वाद घेणारा हा लेख त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.
........
बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे! बालसुलभ कुतुहलानं निसर्गघटितांकडे पाहणारा आणि निसर्गातल्या लोभस सौंदर्यानं बेभान होणारा शब्दसूरलहरींचा प्रवासी! जळगावातल्या धरणगाव इथं १३ ऑगस्ट १८९० रोजी बालकवींचा जन्म झाला. खरं तर ठोंबरे कुटुंब मूळचं कोपरगावचं; पण बापूराव नोकरीनिमित्त धरणगावला स्थायिक झाले. बापूराव आणि गोदूताईंच्या पाच अपत्यांमध्ये जिजी थोरल्या आणि बालकवी ऊर्फ भाऊराव मधले! वडिलांची पोलीस खात्यातील बदलीची नोकरी. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली. त्यांची वडील बहीण जिजी हिनं आरंभीचे संस्कृताचे धडे त्यांना दिले. कवितेची गोडीही तिनंच लावली. जिजींना स्वतःला कवितेची, वाचनाची विलक्षण आवड होती. आर्याभारत, भक्तलीलामृत, रामविजय, पांडवप्रताप यांचं वाचन बालकवींनी सर्वप्रथम केलं ते जिजींबरोबर! संस्कृतप्रचुर शब्दरचना, पंडिती कवितेचा थाट बालकवींच्या काव्यात आढळतो तो यामुळेच! कवितेचा वारसा बालकवींना लाभला तो आजीकडून! त्यांची आजी फार सुरेख ओव्या रचायची; पण बालकवींच्या काव्यप्रेमाला खतपाणी मिळालं ते मात्र जिजींकडून! जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई आणि त्यांचे यजमान प्रल्हादपंत भावे यांचं बालकवींवर अपत्यवत प्रेम होतं. बालकवींच्या पहिल्या काव्याचं पहिलं कौतुक या दाम्पत्याकडूनच झालं. सुरुवातीला मंगलकार्यासाठी पद्य लिहिणाऱ्या, ‘वनवासी’ नामक हरदासाच्या कीर्तनासाठी पदं लिहिणाऱ्या या कवीनं मोरोपंतांच्या प्रभावानं आर्यासुद्धा रचल्या. वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथं असताना त्यांनी पहिली कविता लिहिली आणि निसर्गावरच्या उत्कट प्रेमानं ओथंबलेल्या या कवितेमुळे मराठी काव्यप्रांतात एक नवं युग सुरू झालं. पुढे रामचंद्र कृष्ण वैद्य ऊर्फ वनवासी या हरदासाबरोबर उज्जयिनीला गेल्यावर त्यांच्यासाठीही बालकवींनी अनेक कविता लिहिल्या. पुढच्या तीन-चार वर्षात त्यांची कविता अधिकाधिक विकसित होत गेली आणि जळगाव इथं भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात म्हणजे १९०७मध्ये संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ‘बालकवी’ ही उपाधी दिली आणि त्यानंतर ‘बालकवी’ नावाची अक्षय कांचनमुद्रा मराठी काव्यप्रांतात उमटून राहिली.

चित्रकार नामानंद मोडक यांनी काढलेले, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकातील प्रदर्शनात ठेवलेले बालकवींचे रेखाचित्र.
या कविसंमेलनानंतर दीड महिन्याने बालकवी नगरला रेव्हरंड टिळकांकडे राहायला गेले. टिळकांनी त्यांना अमेरिकन मिशन हायस्कूलमध्ये पाचवीच्या वर्गात दाखल केले. रेव्हरंड टिळक आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे विद्वान आणि रसिक दाम्पत्य! त्यांनी बालकवींवर मुलासारखं प्रेम केलं. त्यांच्या घरी अनेक मासिकं, पुस्तकं यायची. विविध क्षेत्रांतली मान्यवर मंडळी यायची. त्यांचं घर म्हणजे सरस्वतीचा खुला दरबार होता. त्या वातावरणात बालकवी रमून गेले. त्यांची काव्यकलिका उमलली ती रेव्हरंड टिळकांच्या घरी आणि खऱ्या अर्थानं बहरली ती पुण्याला गोविंदाग्रजांच्या सहवासात! त्या वेळी नगरमध्ये सुचलेल्या त्यांच्या अनेक कविता आनंद, मनोरंजन, खेळगडी, बालबोधमेवा या तत्कालीन मासिकात प्रसिद्ध झाल्या आणि बालकवी कवी म्हणून नावारूपाला येऊ लागले. या साऱ्या काळात लक्ष्मीबाई टिळकांच्या मायेची ऊब आणि ज्ञानाचा स्पर्श त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवीत होती. बालकवींच्या आयुष्याला वळण देणाऱ्या, त्यांच्यावर मुलासारखं निस्सीम प्रेम करणाऱ्या दोन ‘लक्ष्मी’ त्यांच्या जीवनात आल्या. एक म्हणजे थोरली बहीण जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई भावे आणि दुसऱ्या साहित्यलक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक. या दोन्ही लक्ष्मींनी बालकवींना घडवले, वाढवले. तिसरी लक्ष्मी म्हणजे संपत्ती. ती मात्र अखेरपर्यंत त्यांच्यापासून फटकूनच राहिली. 

बालकवींना आपल्या कवित्वाची जाणीव ज्या काळात झाली त्याच्या सुमारे वीस वर्षे अगोदर केशवसुतांनी आपली पहिली कविता लिहिली. केशवसुत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक. त्यांचा प्रभाव नंतरच्या काळातील ज्या कवींवर पडला त्यामध्ये रेव्हरंड टिळक, गोविंदाग्रज यांच्याप्रमाणेच बालकवीही होते. रेव्हरंड टिळकांनी काव्य आणि तत्त्वज्ञानाचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. गोविंदाग्रजांनी प्रेमकवितांचा मार्ग स्वीकारला. बालकवींना मात्र निसर्गकवितेचा प्रवाह आपल्या काव्यप्रकृतीला अधिक साजेसा वाटला. त्यांनी तोच जवळ केला, फुलवला आणि आपल्या अनोख्या प्रतिभेचे रंग त्याला देत त्यातून मराठी कवितेला वेगळंच रूपसौंदर्य प्रदान केलं. या लावण्यमयी कवितेनं रसिक आणि समीक्षक यांना नेहमीच भुरळ घातली आणि बालकवी हे मराठी कवितेला पडलेलं एक मधुर स्वप्न ठरलं. 

बालकवींची कविता खऱ्या अर्थानं बहरली ती निसर्गातल्या दिव्य आणि मंगल सौंदर्यामुळेच! त्यांची कविता म्हणजे जणू निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे तालासुरात सजलेले सहजोद्गारच! निसर्ग हा दिव्यत्वाने भरलेला आहे. त्यात मानवी जीवनात नसलेली पूर्णता आढळते, अशी श्रद्धा त्यांच्या मनात होती. निसर्गामध्ये आनंद, प्रेम, सौंदर्य, चैतन्य, औदार्य आणि निःस्वार्थ सहजीवन दडलेलं आहे. मानवी जीवनातल्या अशाश्वतेचा लवलेशही निसर्गात नाही या एकाच गोष्टीमुळे त्यांचं मन निसर्गाशी एकरूप होऊन गेलं. निसर्गातल्या सौंदर्याप्रमाणेच त्यातून होणारा चैतन्यतत्त्वाचा साक्षात्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला परीसस्पर्श करून गेला. बालकवींना सृष्टीमध्ये आनंद व प्रेमाचे सौंदर्य भांडार गवसले. त्या सौंदर्याच्या अवलोकनानं दिव्य आणि निरागस आनंद प्राप्त होतो. या शाश्वत जगातले दुःखपूर्ण, स्वार्थी, हिणकस विचार आणि विकार मनात डोकावत नाहीत. अलौकिक शांती, तृप्ती प्राप्त होते आणि याच तृप्तीत एक उत्कट आनंदगीत बालकवी लिहून जातात. 
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे।

बालकवींनी सृष्टीला ईश्वर मानले नाही, तर त्या जागी सृष्टिदेवता, सौंदर्यदेवता पाहिली. ती पाहताना त्यांच्या मनात प्रणयभावना उपजली आणि या तरुण, सुंदरी सृष्टीला मानवी स्वरूपात रममाण झालेली कल्पितानाच त्यांच्या अनेक कवितांनी जन्म घेतला. त्यांच्या एकूण काव्यसंभारात ३५ ते ४० कविता या निव्वळ निसर्गकविता आहेत. आनंदी आनंद, अरुण, निर्झरास, मधुयामिनी, श्रावणमास, मेघांचा कापूस, पक्ष्यांचे गाणे, ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई, संध्यातारक, आनंदी पक्षी या साऱ्या कवितांमधून आनंद जणू ओसंडून वाहतो. 

नवयुवती उषासुंदरी दारी येऊन जणू आपल्या राजस हस्तांनी रम्य रंगवल्लिका रेखते आहे. दिवस आणि यामिनी परस्परांचे चुंबन घेतात आणि त्यांच्या अनुरागाच्या छटाच जणू पहाटे गगनात उमटतात. अरुणोदयाचा काल हा प्रेमकालच बनून जातो. बालकवी लिहितात - 

परस्परांना दिशा म्हणाल्या प्रेमळ वचनांनी
विरहकाल संपला गा गडे प्रेमाची गाणी।
आम्ही गवळणी हृदयरसांनी पूजू प्रेमाला
प्रेमकाल हा! म्हणोत कोणी अरुणोदय याला।

बालकवींचं हे जणू उषासूक्तच आहे! स्वर्ग अणि भूमीचं ऐक्य घडवून आणणारा, मांगल्याचे पाट चराचरात प्रवाहित करणारा अरुण कविमनाला साद घालतो - 

वाग्देवीने सहज गुंफिलेली बालकवींची रुचिर, सुंदर गाणी आजही मनाला भुरळ पाडतात. निसर्गाशी त्यांची असलेली एकरूपता हाच त्या गीतांचा आत्मा आहे. बालकवींच्या कवितेत सृष्टीचे रेखीव, रंगीत आरेखन वा यथातथ्य छायाचित्र नसते, तर त्यांच्या संस्कारक्षम मनावर उमटलेले सृष्टीचे लोभस प्रतिबिंब असते. नव्या निसर्गाचा शब्दरूप आविष्कार असतो. बालकवींचे निरीक्षण सूक्ष्म आहे अन् त्यांच्या संवेदनांचे विश्व रसरशीत, समृद्ध आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेत केवळ रंगांची मुक्तहस्तानं केलेली उधळणच असते असं नाही, तर त्यात नादांचे झरे वळणं घेतात, गंधांचे उच्छ्वास शब्दांवर तरंगत राहतात. स्वरसंवेदना आणि रंगसंवेदना यांची बालकवींच्या मनाला तरल जाण आहे.  

बालकवींचं एक अत्यंत लोकप्रिय गीत म्हणजे ‘श्रावणमास!’ हे गीत म्हणजे मराठी रसिकांच्या मनातलं कोरीव लेणं आहे. या गीतातली चित्रदर्शी शैली, रंगसंवेदना आणि ओघवत्या नादमय शब्दांची नक्षी रसिकांना थेट श्रावण महिन्याचा राजस अनुभव देते आणि श्रावणातल्या सरसरणाऱ्या शिरव्यात चिंब थरारून टाकते. बालकवी म्हणतात - 

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे॥
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे॥

स्पर्श आणि रंगसंवेदनांचं विलक्षण आकर्षण हे बालकवींच्या अनेक कवितांचं वैशिष्ट्य. ‘मेघांचा कापूस’ कवितेतलं वर्णन याची नेमकी अनुभूती देणारं ठरावं. बालकवी म्हणतात – 

फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा 
कुणी फिरवला हळुवार त्यावरी हात कुसुंब्याचा 
त्यातही हसली मंदपणे ती चंद्रकला राणी
कडेकडेच्या मेघांवर ये मोत्याचे पाणी।

बालवींनी निसर्गाचं वैविध्यपूर्ण रंगचित्र चितारलं. आजूबाजूचा निसर्ग त्यांच्या कविमनात प्रतिबिंबित झाला आणि त्यांच्या प्रतिभासौंदर्याचा अलौकिक रंग लेवून काव्यरूपानं शब्दबद्ध झाला. ही एक विलक्षण किमया आहे. ती किमया अनुभवताना रसिक मनोमन हरखून जतो. हरित तृणांची मखमल, जांभळी वनमाला, पिवळी शेते, पाचूची हिरवी राने, फिकट जांभळा मेघांचा कापूस, लाल गुलालाची मूठ, गंगेच्या शुभ्र जलाचा स्रोत, सोन्याहून पिवळे ऊन असा रंगांच्या सुंदरतेचा जलसा त्यांच्या कवितेत उभा राहतो. तो रसिकाला अशीच रम्य सौंदर्यानुभूती देतो. रंगात रंगलेल्या त्यांच्या कविता या राजस हस्तांनी रेखाटलेल्या रंगवल्लिका बनून जातात. दृक् संवेदनांची अशी शेकडो चित्रं बालकवींच्या कवितेत आहेत. सूर, रंगचित्रांच्या सोबतीला मधुर नादचित्रंही आहेत. ‘गीतस्वरांनी सृष्टी भरली’ ही अनुभूती कवीला येते ती यामधूनच! गंध आणि स्पर्श प्रतिमांचा सुयोग्य वापर या कवितांना परीसस्पर्श करून जातो. औदुंबर, मेघांचा कापूस ही तर रंगांच्या जादूची आणि स्वरांच्या किमयेची पैजा जिंकणारी उदाहरणं म्हणून खुशाल पुढे करावीत. 

बालकवींच्या सर्वोत्कृष्ट कवितांपैकी एक कविता म्हणजे ‘औदुंबर.’ अवघ्या आठ ओळीत साकारलेलं जणू एखादं लँडस्केपच! मोजक्या शब्दांत व्यक्त झालेलं कवितेचं वास्तववादी, हुबेहूब छायाचित्र! ‘औदुंबर’ ही कविता आजतागायत आपल्या गूढरम्य सौंदर्यानं रसिकांना अन् समीक्षकांनाही विशेष आवाहन करीत आली आहे. या चिमुकल्या कवितेतलं चित्र इतकं नाजूक आहे, की क्षणभर शब्द रंगात भिजून गेल्याचा भास होतो. पहिल्या सात ओळींतल्या रंगकामानंतर शेवटच्या ओळीत एकाएकी डोळ्यांपुढे उभं केलेलं स्थिर चित्र अंगावर रोमांच आणतं. या कवितेमधून रसिकाच्या मनावर होणारा पहिला परिणाम हा परिपूर्ण, सुंदर निसर्गदृश्य पाहिल्याचा असतो. औदुंबरात कुणाला विरक्त, संन्यासी योगी दिसतो, तर कुणाला तो कालपुरुषाचे प्रतीक वाटतो. ‘औदुंबर’ ही एक स्वच्छ, नितळ, पारदर्शक कविता आहे, हे मात्र नक्की! बालकवी म्हणतात - 

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातुन

एकूणच ‘औदुंबर’ एक मनोरम निसर्गचित्र आहे. जसं दिसलं, तसं चितारलेलं ते एक हुबेहूब वास्तववादी दृश्य आहे. बालकवींच्या नित्याच्या कल्पनासृष्टीच्या वर्णनात हे वास्तववादी चित्र फारच खुलून दिसतं. त्यातलं रंगसौंदर्य अतुलनीय आहे. रंगांचं आकर्षण हे बालकवींचं वैशिष्ट्य फार कमी कवींमध्ये दिसतं. ‘औदुंबर’ तर रंगछटांनी अक्षरशः न्हाऊन निघाली आहे. रंग, नाद आणि रेखा यांची गोंडस रंगसंगती फुलवणारा बालकवींसारखा कवी एखादाच! त्यांनी सारे रंग टिपले तेही विलक्षण संवेदनक्षमतेनं आणि हळुवारपणे! रेषांच्या संगतीला नवं परिमाण देणारी रंगसंगती निसर्गाचा संवेदनामय अनुभव देऊन जाते. शेवटच्या ओळीतलं सहा शब्दांतलं चित्र तर केवळ अपूर्व आहे. रेषासौंदर्य, लयसौंदर्य यांचं प्रत्यंतर देणारं आठ ओळींच्या चिमुकल्या कवितेतलं स्वयंपूर्ण निसर्गचित्र म्हणूनच मनोरम्य ठरतं आणि वर्षानुवर्षं रसिकांच्या मनात आपली सुवर्णमुद्रा उमटवीत अधिराज्य गाजवीत राहतं, हे निश्चित! (या कवितेच्या अभिवाचनाचा व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

स्त्री-पुरुष प्रेमासंबंधी बालकवींनी मोजक्याच कविता लिहिल्या. ‘प्रीति हवी तर’ कवितेत त्यांनी प्रेमोत्सुक स्थितीचं जोरदार वर्णन केलं आहे. प्रेमाचा आनंद गगनात मावेनासा झाला, की ते डोळ्यांतून ओसंडून वाहू लागतं. प्रेमावाचून जगही सुनंसुनं असते. अशी प्रेमाची उत्कटता ‘प्रेमाचे गाणे’मध्ये अनुभवायला मिळते. बालकवी म्हणतात - 

प्रेम कुठे? ते रानभरी प्रेम खेळते फुलावरी
प्रेम जिथे ती वनराई स्वर्ग तिथे बहरूनी येई
ये तर गगनी
जगी हिंडुनी
आणू शोधुनी
प्रेम फिरे स्वच्छंदाने
प्रेमावाचुनी सर्व जुने जग भासे बापुडवाणे॥

प्रेमासंबंधीच्या अशा मोजक्याच कवितांमध्ये उन्मादक वृत्तीची परिसीमा म्हटली जाणारी, मुग्ध प्रणयाचा मोहक संवाद असलेली नि रसिकांच्या ओठांवर खेळणारी कविता - ‘गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी!’ भावनेतली कोमलता, वर्णनातली चित्रात्मकता, शब्दांचं मार्दव आणि संवादातला मोकळेपणा यांमुळे ही कविता एक उत्कृष्ट प्रेमगीत ठरली आहे. त्यामुळेच अपूर्ण कविता असूनही ती रसिकांना मात्र पूर्णपणे प्रेमरसात भिजवते. 

‘बालकवी’ आणि ‘फुलराणी’ हे तर अतूट नातं सांगणारं शब्दशिल्पच आहे. निसर्गाशी असलेली एकरूपता हा बालकवींच्या बहुतांश कवितांचा स्थायीभाव आहे. त्यांची निसर्गाविषयीची सहृदयता सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी आहे. निसर्गाच्या विशिष्ट आविष्कारापेक्षा किंवा दर्शनापेक्षा त्यातल्या सौंदर्याचं मूलभूत तत्त्वच त्यांना आकर्षित करीत होतं. म्हणूनच त्यांचा निसर्ग कोणत्याही एका दृश्याशी, स्थळाशी व वस्तूशी बांधलेला नाही. तो सर्वसमावेशक आहे. शिव आणि मांगल्यामध्ये रममाण होणारा आहे. ‘फुलराणी’मधलं निसर्गदर्शनही असंच आहे. 

बालकवींचं एकूण जीवन दुःखमय होतं असं त्यांच्या चरित्रावरून, तसंच काही कवितांमधूनही जाणवतं. जे जीवनात नाही, ते निसर्गाघटितांमध्ये शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सृष्टीतलं अनुपम सौंदर्य हेच त्यांच्या दुःखावरचं औषध होतं. शिवसुंदराचा ध्यास ही त्यांची प्रवृत्ती होती. बालकवींची बालसुलभ निरागसता आणि निसर्गातल्या पारोपकारी, निरपेक्ष प्रेमाचा साक्षात्कार यातूनच त्यांनी ‘फुलराणी’ला शब्दांनी गोंजारलं. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे’ हे कविवर्य केशवसुतांचं वचन बालकवींच्या बाबतीत शब्दशः आणि शभर टक्के खरं ठरलं. हिरव्यागर्द ताजेपणात सजलेली, कथाकहाणीतील अद्भुताचा गोडवा ल्यालेली आणि विलक्षण चित्रमय शैलीचं प्रत्यंतर देणारी ही फुलराणी ... बालकवी म्हणतात - 

हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती!

बालकवींचं व्यक्तिगत जीवन दुःखमय होतं, असं त्यांच्या अनेक कवितांमधून जाणवतं. त्यातूनच या जगापासून मनानं दूर जाण्याची त्यांची वृत्ती वाढत गेली. आपण दुःखांनी भरलेल्या जगात नांदत आहोत याची त्यांना सतत जाणीव आहे. मानवी जीवनात अनेक प्रकारच्या उणिवा असून, ते कधीच परिपूर्ण होऊ शकणार नाही, याचं शल्यही त्यांच्या मनात आहे. ही भावना, त्यातून येणारी विषण्णता त्यांचं मन जाळीत आहे. जग पराकाष्ठेचं स्वार्थी आहे. त्यामध्ये दीनदुबळ्यांचे हाल होतात, ते भरडले जातात. या विचारानं येणारी अस्वस्थता आनंदगीतातही उमटल्यावाचून राहात नाही. ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेत शेवटी बालकवी म्हणतात - 

स्वार्थाच्या- बाजारात किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो? सोडुनि स्वार्थी तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे ॥

कवीला नैराश्यानं घेरलं आहे. त्यातूनच प्रलयकाळाची, भयाण काळोखाची, पर्यायाने मृत्यूची ओढ लागली आहे, असं अनेक कवितांमधून जाणवते. एका कवितेत ते म्हणतात -

बोलवितात । विक्राळ यमाचे दूत
गिरिशिखरावर ‘आ’ पसरोनी
काळ्या अंधारात दडोनी
किंवा पडक्या बुरुजावरूनी,
शब्द येतात। ‘चल नको बसू जगतात’॥

खोल खोल भेसूर दरडीत 
पडक्या घोर जुन्या विहिरीत
उगवुनि पिंपळ वर येतात
ते म्हणतात। ‘चल जगात दुसऱ्या शांत’॥

आत्यंतिक आनंद आणि अती दुःख ही दोन्ही बालकवींच्या व्यक्तिमत्त्वाची अविभाज्य अंगं होती, हे त्यांच्या अशा अनेक कवितांमधून स्पष्ट होतं. डॉ. व. दि. कुलकर्णी म्हणतात, ‘दुःखी, निराश मनोवृत्ती हा केवळ प्रौढतेचा शाप होता, असे वाटत नाही. जगाने बालकवींना छळले असे दिसत नाही. अर्थविवंचना सर्वच कवींच्या मागे होती. त्याचा हिशेब मांडण्यात हशील नाही. बालकवींच्या मनोभूमीतच या दुःखाची मूलबीजे आहेत असे वाटते. पार्थिवतेची तुसे त्यांच्या मनाला पहिल्यापासूनच बोचत असावीत. त्यांना अध्यात्म पचले नाही आणि ऐहिक रुचले नाही. त्यांच्या ‘हृदयाची गुंतगुंत’ त्यामुळेच झाली. हर्ष आणि शोक हे त्यांच्या कवितेचे दोन स्थायीभाव. हे दोनही कधी पृथक्पणे, विशुद्धतेने येतात, तर कधी पाठीस लावून येतात; पण हे भाव येतात ते उत्कट रूप घेऊन येतात. दोनही सूर आळविणारे हृदय एकच आहे. स्वर्गीय प्रेमाने उचंबळून येणाऱ्या आणि पार्थिव दुःखाने जागच्या जागी थिजून जाणाऱ्या या एकाच हृदयाच्या दोन बाजू आहेत.’

...पण बालकवींच्या निराशामय काव्यप्रवासापेक्षाही लक्षात राहते, ठळकपणाने उठून दिसते ती तारुण्याच्या दिशेने वळलेली त्यांची चैतन्यमय बालसुलभ वृत्ती. त्यांच्या कवितेत दिसणारा भावनांचा ताजेपणा, उत्फुल्लता, कुतूहलनिश्रित दृष्टी, रंगांचं आणि आकृतींचं आकर्षण, स्पर्शसंवेदनेतली उत्कटता, सुख-दुःख, हर्ष-शोक, अंधार-प्रकाश अशा टोकाच्या वृत्तींचं घडणारं दर्शन, प्रणयभावनेतली कोवळीक, उत्तान शृंगाराचं वावडं हे त्यांच्या याच बालसुलभ वृत्तीचे निदर्शक. या सर्वच वृत्ती त्यांच्या कवितेतून प्रामाणिकपणे अभिव्यक्त होतात. त्यामुळेच त्यांची कविता भावनेची सच्ची अनुभूती देते. 

सौंदर्याचा ध्यास, त्याची अतीव लालसा बालकवींच्या मनात आहे; पण त्या लालसेमध्ये कामुकतेचा लवलेश नाही. शृंगाराचा गंध नाही. निसर्गसौंदर्याचं वर्णन करताना स्त्री सौंदर्याचं उन्मादक दर्शन घडविल्याखेरीज कालिदास पुढेच जात नाही. किट्स् आणि स्पेन्सरच्या लेखनातही कामुकतेची भडक दृश्यं डोकावतातच; पण बालकवींच्या कवितेला मात्र या विचारांचा पुसटसा स्पर्शही झालेला नाही. त्यांच्या मनातल्या सौंदर्याला पवित्रतेची उंची आहे, भावनेतल्या सच्चेपणाची खोली आहे. त्यामुळेच त्यांच्या जीवनातल्या एका अप्रकाशित अध्यायातही - रमाईच्या बाबतीतही त्यांच्या वर्तनातला हा शिवसुंदराचा ध्यास प्रतीत झाल्याशिवाय राहात नाही. 

रमाई ही एक सत्शील, भोळीभाबडी, पण रूपवान विधवा रसिका. आपले मित्र आप्पासाहेब सोनाळकर यांच्याकडून तिची वर्णनं ऐकून बालकवींच्या मनातलं तिच्या रूपाविषयीचं आकर्षण जागं होतं. त्या मनोमन कल्पिलेल्या सौंदर्यस्मृती म्हणजे त्यांच्या अनेक कवितांची प्रेरणा. तिला भेटण्याची अनिवार ओढ त्यांच्या मनात असते; पण आप्पासाहेब ही भेट टाळत राहतात. अनेक दिवसांनी एकदा अचानकपणे रमाईचं ओझरतं दर्शन होतं आणि बालकवींना कविता स्फुरते, ‘गर्द सभोती रान साजणी तू तर चाफेकळी!’ मनाला विलक्षण हुरहूर लावून रमाई निघून जाते. या सौंदर्याचा विचार करता करता त्यांच्यासमोर अनेक प्रश्नी उभे ठाकतात. ही रमाई कोण? तिचं आपलं नातं काय? या नात्याला काही नाव द्यायचं असलं तर? तिच्याविषयीची ही अनिवार ओढ आपल्या मनात का? नेमकं काय वाटतंय आपल्याला? एक ना दोन, असंख्य प्रश्नच.... आणि कालांतरानं त्यांना मनोमन जाणवतं, हिचं आपलं नातं एकच - मायलेकरांचं - अंतर्बाह्य शुद्ध, सात्त्विक असून प्रेरणादायी ठरणारं, आणि मग बालकवी लिहितात -देवे तुम्हा दिली आई। तेसी ब्रह्मांडी रमाई।

बालकवींच्या मानसिक प्रवासावर आधारलेलं एक अभ्यासपूर्ण नाटक म्हणजे ‘तू तर चाफेकळी.’ या नाट्यनिर्मितीबाबत लिहिताना ज्येष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर म्हणतात, ‘बालकवींच्या पत्रातील ‘निसर्गजननींच्या विलक्षण अनुभवाने ‘देवे तुम्हा दिली आई, तैसी ब्रह्मांडी रमाई’ या ओळींचा वेगळाच अर्थ मला लागला. त्यामुळे बालकवी - रमाई संबंधांचे गूढच मला उकलले असे नाही, तर बालकवींच्या व्यक्तिमत्त्वाला एक कणा प्राप्त झाला. एका श्रेष्ठ कविमनाचा ठाव घेण्यासाठीचा प्रवास अनोळखी रानावनातून सुरू झाला. मग हा नेहमीचा ‘दोन पुरुष - एक स्त्री’चा त्रिकोण राहिला नाही, तर ते कवितेच्या जन्माचे, कविमनावर होणाऱ्या ‘संस्कारांचे’ आणि त्याच्या धडपडीचेही नाटक झाले.’ 

बालकवींच्या काव्याला बहर आला, त्याआधी २०-२५ वर्षे महाराष्ट्रात फार मोठी वैचारिक क्रांती सुरू झाली होती. केशवसुतांनी विशाल मानवतेचे ध्येय उरी बाळगत बंडाची ‘तुतारी’ फुंकली होती. लौकिक जीवनातल्या साध्या विषयातही मोठा आशय पाहणारी, वैयक्तिकतेचा आविष्कार हेच आपलं वैशिष्ट्य बनविणारी नवी कविता मराठीत रूढ होत होती. त्याच वेळी सामाजिक प्रश्नां नाही कवितेचं व्यासपीठ मिळत होतं. रेव्हरंड टिळकांनी जीवनातल्या विसंगतीचं चित्रण, प्रवृत्ती श्रेष्ठ की निवृत्ती याबाबतचं विवेचन ‘वनवासी फूल’मध्ये केलं होतं. जाती-धर्मभेदाविरुद्ध आवाज उठवला होता. पहिल्या महायुद्धाची धामधूम चालू होती; मात्र या कुठल्याच वादळांचं प्रतिबिंब बालकवींच्या काव्यात उमटलं नाही. ‘धर्मवीर’ या कवितेचा अपवाद वगळता ते या विषयांपासून अलिप्तच राहिले. 

प्रासादिकता हा त्यांच्या कवितेचा खरा आत्मा. त्यांच्या कवितेतला लडिवाळ खेळकरपणा मनाला भुरळ पाडतो. त्यांच्या कवितेत संस्कृत शब्दांचं प्रमाण मोठं आहे; पण ते पांडित्यप्रचुर नाहीत. त्यांची भाषाशैली चित्रमय स्वरूप लाभलेली, नाट्यमुद्रा असणारी आहे. आंतरलय, बाह्यलय, सुकुमारता, लावण्य, कल्पनांचं सहजपण, रचनेचं सहजपण व वर्णमाधुर्य हे या कवितेचे विशेष. भाषेचं हे रसायन निद्रिस्त, मलूल शब्दांना नवी जाग आणतं. त्याला साहाय्यभूत ठरतं. नादमाधुर्याला अनुप्रासात्मक ठसकेबाज शब्दांनी लयीची जोड मिळते. ती चांदण्यासारखी सर्व कवितेवर पसरलेली आढळते. सौंदर्याचा उपासक असलेला हा आत्ममग्न कवी आपलं जेमतेम २८ वर्षांचं आयुष्य अमूर्त सौंदर्याचा साक्षात्कार आणि अतींद्रिय प्रेमाची लालसा उरी बाळगून जगला. जळगावजवळच्या भादली स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडताना त्यांचं अपघाती निधन (पाच मे १९१८) झालं. 

जेमतेम २८ वर्षांचं आयुष्य... त्यातला काव्यलेखनाचा काळ उणापुरा १०-११ वर्षांचा... एकूण कविता १६३... पण त्यातल्या कितीतरी सुभग... साजिऱ्या... रसिकांच्या मनात रुंजी घालत राहणाऱ्या... आत्यंतिक निरागस आनंद अन् विषण्णतेचा भयाण काळोख, दोन्हीही भरभरून देणाऱ्या... आणि कविताविश्वरच्या मर्यादाही जाणवाव्यात इतक्या ठसठशीत... निसर्गकवितांमधून त्यांनी सादर केलेली मानवी भावनांचा आरोप केलेली निसर्गदृश्यं, अंतर्हृदयाला काळोखून टाकणाऱ्या उदासीनतेचं त्यांनी केलेलं भावार्त चित्रण आणि सुकुमारतेचं रूपलावण्य लाभलेली भाषाशैली हे बालकवींच्या कवितेचं खरंखुरं संचित. त्याच्या सामर्थ्यावर या कविता रसिकांना आपल्या माधुरीनं मोहवित राहतात आणि आठवतं ते कविवर्य कुसुमाग्रजांनी बालकवींचं रेखाटलेलं शब्दचित्र...

हे अमर विहंगम! गगनाचा रहिवासी
त्या नीलसागरावरचा चतुर खलाशी
प्रिय सखा फुलांचा ओढ्यांचा सांगाती
त्यांच्यास्तव धुंडुनी ताराकण आकाशी
आणसी धरेवर अक्षर या धनराशी!

- स्वाती महाळंक
संपर्क : ८८८८१ ०२२०७

(लेखिका पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आहेत.)

(बालकवींच्या निवडक कविता अन् त्यांवरचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा. बालकवींचं साहित्य ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/FK6pzC येथे क्लिक करा.)



(लेख पूर्वप्रसिद्धी : २६ फेब्रुवारी २०१८)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZXSCM
Similar Posts
लोकशिक्षक संत तुकाराम जीवनातील सर्व चढउतारांमध्ये संत तुकारामांमधील माणूसपण टिकून राहिले आहे. सर्वसामान्य माणसासारखे राहून, माणूसपणा कायम ठेवून माणुसकीच्या शिडीवरून देवत्वाला पोहोचलेला हा संत आहे. म्हणूनच सर्वसामान्यांना ते आपलेसे वाटतात. त्यांनी लोकशिक्षकाची मोठी भूमिका निभावली. आज तुकाराम बीज आहे. या दिवशी संत तुकारामांचे सदेह वैकुंठगमन झाले असे मानले जाते
बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन - स्वाती महाळंक त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा
रेने गॉसिनी आपल्या अॅस्टेरिक्स कॉमिक्समुळे जगभरच्या आबालवृद्धांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारा फ्रेंच लेखक रेने गॉसिनी याचा १४ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर २६ ते २८ मार्च २०२१ या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. कुशाग्र बुद्धिमत्तेचे संशोधक आणि विज्ञानासारख्या प्रामुख्याने इंग्रजीवरच आधारित असलेल्या क्षेत्रात कार्यरत असूनही शुद्ध आणि साध्या-सोप्या मराठी भाषेत साहित्यनिर्मिती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language